परभणी : सेलू पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील गुन्ह्यामध्ये आरोपीस चार वर्ष कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश के.एफ.एम खान यांनी बुधवारी दिला.
याबाबत महिती अशी, १७ जानेवारी २०२३ ला सेलू ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. ज्यामध्ये आरोपी रामेश्वर विष्णू पौळ (रा.डिग्रस पौळ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. आरोपीने फिर्यादीची ८ वर्षीय मुलगी हिचा घरात नेऊन विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केले होते. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळे यांनी तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश के.एफ.एम.खान यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यामध्ये सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली व इतर कागदोपत्री पुरावा सिद्ध करण्यात आला.
या प्रकरणातील आरोपीने यापूर्वी देखील अशाच प्रकारचा गुन्हा केला असून त्या प्रकरणात त्यास तीन वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड झाला आहे. सर्व पुराव्याचे अवलोकन करून बुधवारी न्यायालयाने आरोपीला चार वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मुख्य सरकारी वकील ज्ञानोबा दराडे, अतिरिक्त सरकारी वकील देवयानी सरदेशपांडे यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी संतोष सानप, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.