कोरोना कालावधीत ज्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचे निधन झाले आहे, अशा कुटुंबातील विधवा महिलेला पन्नास हजार रुपये अनुदान जिजामाता/ जिजाऊ या योजनेंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे खोटे मेसेज मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात अशी कुठल्याही प्रकारची योजना या विभागाची नाही, असे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, पूजा रमेश पाटील आणि पूजा आकाश ठक्कर या महिलांच्या नावाचा दूरध्वनी क्रमांक देऊन सदरची योजना चालू असल्याचे भासविले जात आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा अशा खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. एखाद्या विभागाची योजना अस्तित्वात आल्यानंतर त्याबाबत शासन निर्णय होऊन महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जातो. त्यानंतर ती योजना अस्तित्वात येते. त्याबाबत जिल्हास्तरावरील त्या विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सदर योजनेचा प्रचार प्रसार केला जातो. त्यामुळे अशा फसव्या आमिषाला बळी पडू नये, असे ते म्हणाले.
‘जिजामाता / जिजाऊ योजनेबाबत कार्यालयात येऊन काहींनी विचारणा केली तर काही जणांचे दूरध्वनी येत आहेत. या विभागाची अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नसताना कार्यालयाला लोकांचे समुपदेशन करण्यासाठी आपला वेळ खर्ची घालावा लागत आहे. अशा भूलथापांना कोणीही बळी पडू नये.
-डॉ. कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी.