परभणी : पारवा शिवारात शेतातील आखाड्यावर झालेल्या दरोडा आणि अत्याचार प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मंगळवारी कुख्यात गुंडाला सापळा रचून पूर्णा येथून ताब्यात घेतले. आता घटनेतील ताब्यात घेतलेल्या एकूण आरोपींची संख्या तीन झाली आहे.
पारवा शिवारात शेतातील आखाड्यावर तीन जानेवारीला रात्री अनोळखी पाच इसमांनी आखाड्यावर येऊन पीडितेवर अत्याचार करून पतीला डोक्यावर हत्याराने मारून जखमी केले होते. तसेच जबरदस्तीने सोने, चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी परभणी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी घटनेत दोन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले होते. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या पथकाने मंगळवारी फरार आरोपी वारुशी उर्फ विष्णुवर्धन उर्फ अजित बसवराज पवार (२५, रा.वाळूज, पत्रा कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यास रेल्वे पटरीजवळ पूर्णा येथून सापळा रचून ताब्यात घेतले.
हा आरोपी पूर्ण रेल्वे पटरी जवळ लपून राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून संबंधितास ताब्यात घेऊन ग्रामीण ठाण्यात हजर करण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्येपोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, किशोर चव्हाण, जमीरोद्दीन फारुकी, गजानन शिरसागर, शरद सावंत, गणेश कौटकर यांनी केली.