परभणी : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत १ डिसेंबरपासून आधार क्रमांकावर आधारित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, जिल्ह्यात या योजनेसाठी नोंद केलेल्या शेतकऱ्यांपैकी तब्बल १ लाख १४ हजार ९१९ शेतकऱ्यांचे आधार क्रमांक अद्यापही प्राप्त झाले नसल्याने या शेतकऱ्यांच्या मानधनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबविली जाते़ या योजनेत पीएम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांकडून नोंदणी करणे आवश्यक आहे़ आतापर्यंत परभणी जिल्ह्यातून २ लाख ६७ हजार ९६२ शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे़ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरातून तीन वेळा प्रत्येकी २ हजार रुपये याप्रमाणे ६ हजार रुपये मानधन दिले जाते़ मागील वर्षीपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे़ योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभही मिळाला आहे़ मात्र या योजनेत आधार क्रमांकाच्या आधारावर लाभ वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्यामुळे १ डिसेंबरनंतर आधार लिंक असणाऱ्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ होणार आहे़
जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार ९६२ शेतकऱ्यांपैकी १ लाख ५२ हजार ७४८ शेतकऱ्यांचे नाव आधार क्रमांकाशी जोडले गेले आहे़ त्यामुळे या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल़; परंतु, १ लाख १४ हजार ९१९ शेतकऱ्यांचे आधार क्रमांक अजूनही जोडले नसल्याने या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत़ दरम्यान, जिल्हा प्रशासनाने लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांचा डाटा आधार सलग्न करण्याचे आवाहन केले आहे़ आपले सरकार सेवा केंद्रावर ही सुविधा उपलब्ध आहे़ त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना थेट पोर्टलवर जाऊनही आधार क्रमांक जोडता येणार आहे़ तेव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवरील आपले नाव आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे़
महसूलचे प्रयत्न सुरूमहसूल प्रशासनातील गाव स्तरावरील अधिकारी- कर्मचारी शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गावा-गावात या संदर्भात जनजागृतीही केली जात असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.