जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने सेलू तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विकास योजनेंतर्गत सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी, बोरगाव जहागीर, लाडनांद्रा, करडगाव, तळतुंबा या ग्रामपंचायतींना रस्ता व नाली कामासाठी प्रत्येकी ५ लाख रुपये, तर आहेर बोरगाव ७ लाख २८ हजार, निपाणी टाकळी ३ लाख, ढेंगळी पिंपळगाव ६ लाख ९० हजार, देऊळगाव गात ८ लाख ७० हजार, पिंपळा २ लाख १० हजार, सिद्धनाथ बोरगाव ७ लाख ८० हजार, खेरडा ४ लाख, कुंडी २ लाख, तर कोलदंडी ग्रा.पं.ला ३० हजार अशा प्रकारचा निधी रस्ता व नाली कामासाठी मंजूर झालेला आहे. तर वस्तीत सौर पथदिवे बसविण्यासाठी रवळगाव १० लाख ६७ हजार, राधे धामणगाव व करडगाव प्रत्येकी ४ लाख, निरवाडी खुर्द ११ लाख ९० हजार, सेलवाडी ६ लाख ५० हजार, गुगळी धामणगाव ९ लाख ५० हजार, राजवाडी २ लाख ५० हजार, वाई ४ लाख २५ हजार, कुपटा ३ लाख, गोहेगाव ३ लाख ४७ हजार निधी मंजूर झालेला आहे. तर पाणीपुरवठा या कामासाठी देवगाव फाटा, साळेगाव, ब्रह्मवाकडी, दिग्रस बुद्रुक, दिग्रस खुर्द, हट्टा, करजखेडा, नरसापूर, बोरकिनी, सोना, वालूर, राजा, मोरेगाव, पिंपरी या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ३० हजार रुपये तर कुंडी व कुपटा या दोन ग्रामपंचायतींना प्रत्येकी २ लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. या निधीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींपैकी केवळ ४० ग्रामपंचायतींना या निधीचे वितरण करण्यात आले. मात्र, उर्वरित ४२ ग्रामपंचायतींना कुठलाही निधी मिळाला नाही.
निधी वितरणात दुजाभाव
जिल्हा परिषद प्रशासनाने समाज कल्याण विभागातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील वस्तीत विकासाकरिता निधी मंजूर केला. यामध्ये बहुतांश भाजपप्रणीत ग्रामपंचायतींसाठी केवळ पाणीपुरवठ्याच्या खर्चासाठी ३० हजार रुपयांचा तोटक निधी मंजूर केला. याशिवाय केवळ दोनच ग्रामपंचायतींना पाणीपुरवठासाठी २ लाख रुपये निधी कसा मिळतो, याशिवाय रस्ता व नाली काम आणि सौर दिव्यांसाठी काही निवडक ग्रामपंचायतींना निधीची खिरापत वाटली, अशी प्रतिक्रिया देवगाव फाटा येथील सरपंच जिजाबाई तुकाराम सोन्ने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.