जिंतूर : शहरातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून, शहरातील विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
पालकमंत्री मलिक यांच्या हस्ते जिंतूर शहरात विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जमजम कॉलनी येथे २ कोटी १५ लाख रुपये खर्च करून बांधलेल्या मौलाना हुसेन अहेमद मदनी बहुउद्देशीय सभागृह तसेच ७९.४१ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या स्ट्रीट लाइट व हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
मलिक म्हणाले, मागील दीड वर्षापासून राज्यात कोरोना महामारीने गंभीर रूप धारण केल्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती मोडकळीस आली असली तरी राज्य सरकार खंबीर आहे. तसेच राज्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी आडचणीत सापडला आहे. त्यांनादेखील राज्य सरकार भरीव मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.
मागील १५ वर्षांच्या काळात जिंतूर नगर परिषदेच्या माध्यमातून विकास खुंटला होता, त्यास नवीन विकासाची दिशा देत जिंतूर शहरात रस्ते, नाल्या, पाणी व विजेच्या समस्या प्रामुख्याने सोडवल्या असून मुस्लीम बांधवांसाठी तीन शादीखाने, कब्रस्तान व इतर सोयी-सुविधा पुरवल्या आहेत, असे माजी आमदार विजय भांबळे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास माजी आमदार विजय भांबळे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, नगराध्यक्ष साबिया बेगम कपिल फारुकी, सभापती रामराव उबाळे, प्रसादराव बुधवंत, मौलाना मोहम्मद जलील मिल्ली, मौलाना तज्जमुल, मौलाना रसूल, सभापती गणेशराव इलग, जि. प. सदस्य अशोकराव काकडे, राजेंद्र लहाने, बाळासाहेब भांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांचा राकात प्रवेश
माजी आ. विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक अ.सोहेल अ.खादर, पं. स. सदस्य माणिकराव बहिरट, वैजेनाथ शेंगुळे, संतोष भवाळ, कुदरत बेग मिर्झा, शेख खालील शेख बुढन, वामन बालासाहेब कदम, संजय मुंजाजी कदम, ओमकार कदम आदी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
यावेळी, जि. प. सदस्य विश्वनाथ राठोड, मुरलीधर मते, बाळासाहेब घुगे, अभिनय राउत, विठ्ठल घोगरे, मनोज थिटे, उपसभापती शरदराव मस्के, पं. स. सदस्य मधुकर भवाळे, विजय खिस्ते, मुंजाभाऊ तळेकर, बाबाराव ठोंबरे, आदींची उपस्थिती होती.