परभणी : परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करीत असताना निधीची आवश्यकता जाणवणार नाही. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात यापूर्वीच यासाठीची व्यवस्था उपलब्ध आहे, अशी माहिती परभणीकर संघर्ष समितीचे संयोजक तथा माजी आ. विजय गव्हाणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
शहरातील महात्मा फुले विद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, परभणीकर संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमुख यांची घेण्यात आलेली भेट अत्यंत सकारात्मक होती. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे पत्र दिले आहे. त्यामध्ये परभणी येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी शहरातील सर्वे क्रमांक ५११, ५१३, ५१५/१, ५१५/२ चे एकूण क्षेत्रफळ १४.८८ हेक्टर आर व ब्रह्मपुरी येथील गट क्रमांक २, २०, ४७, ५३ एकूण क्षेत्र ५२.६ हेक्टर या जागेमध्ये टप्प्या टप्प्याने बांधकाम करणे शक्य आहे. तथापि परभणी शहरातील व ब्रह्मपुरी येथील संबंधित जागा मराठवाडा विकास महामंडळ यांची दुय्यम कंपनी परभणी कृषी गोसंवर्धन यांची असल्याने वैद्यकीय महाविद्यालयाकरीता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत होणे आवश्यक असल्याचे कळविले आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषानुसार जिल्हा रुग्णालय परिसरालगत किंवा नजिकच्या भागात किमान १५ एकर जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरण करावी, जेणे करून सदरील जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या पुढील प्रस्तावास शासनमान्यतेसाठी सादर करणे शक्य होईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दोन दिवसांत या पत्राला जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे. ही बाब महत्वपूर्ण आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची अडचण जाणवणार नाही. येथे यापूर्वीच सर्व व्यवस्था उपलब्ध आहे. शिवाय मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाने यापूर्वीच अनुशेषांतर्गत परभणीतील शासकीय वैद्यकीय महािवद्यालयासाठीची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. राज्यपालांनीही शासनाला तसे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही परभणीत वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत हे महाविद्यालय होणार नाही, तोपर्यंत थांबणार नाही. या संदर्भात जनजागृतीकरीता जनतेमध्ये जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी रामेश्वर शिंदे, तहसीन खान, अजय गव्हाणे, सुभाष जावळे, पवन निकम आदींची उपस्थिती होती.