देवगाव फाटा (जि. परभणी) : सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथे १३ सप्टेंबर रोजी बेलदार समाजातील एका महिलेचा अंत्यविधी चक्क आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या परिसरात करण्यात आला. यामुळे येथील स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
देवगावफाटा येथे बेलदार, बंजारा, मराठा, वाणी, कुंभार, तेली, सुतार समाजासाठी स्मशानभूमी नाही. यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. पावसाळ्यात परिस्थिती खूपच बिकट होते. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. १३ सप्टेंबर रोजी बेलदार समाजातील एका महिलेचा अंत्यविधी आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या परिसरात करण्यात आला.
आरोग्य सेविका एस.एस. कप्पे, सेवक ए.एम. तारु, आशा वर्कर ज्योती पांचाळ यांनी यास विरोध केला. मात्र, त्यांचे कुणी ऐकले नाही. ही माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाला दिली. मात्र कोणीही लक्ष दिले नाही. यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची व गरोदर माता, लसीकरण लाभार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर स्मशानभूमीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.