परभणी: श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांच्या पालखीचे शहरात सकाळी ७ वाजता आगमन झाले. शहरात पालखी आल्यानंतर भाविकांनी ठिकठिकाणी दर्शन घेतले.
पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथील जिल्ह्याच्या हद्दीवर सोमवारी दुपारी २़३० वाजता श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले़ यावेळी खा़ संजय जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, सिद्धेश्वर संस्थानचे महंत शिवानंद महाराज आदींची उपस्थिती होती़ त्यानंतर ही पालखी वसमत महामार्गाने परभणी शहराकडे मार्गस्थ झाली़ सायंकाळी श्रीक्षेत्र त्रिधारा येथे पालखी मुक्कामी थांबली होती़ त्यानंतर मंगळवारी सकाळी ७ वाजता श्रींच्या पालखीचे शहरात आगमन झाले.
पालखी शहरात आल्यानंतर वसमत महामार्गावर भाविकांनी ठिकठिकाणी पालखीचे दर्शन घेतले़ मंगळवारी श्री रोकड हनुमान मंदिरामध्ये पालखी मुक्कामी थांबणार असून बुधवारी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे़ यावेळी पोलीसांनी चोख बंदोवस्त ठेवला होता़