पाथरी : मराठा आरक्षण आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तालुक्यातील चाटेपिपळगाव ग्रामपंचायतच्या एका जागेवरील पोट निवडणूकीसाठी ग्रामस्थांनी गांधीगिरी करत निवडणूक रिंगणात 203 महिलांचे उमेदवारी अर्ज दाखल केले.छाननीनंतर 155 महिला उमेदवार रिंगणात राहिले. मात्र इव्हीएमवर जास्तीतजास्त 60 उमेदवारांच्या नावासाठी जागा आहे.त्यामुळे निवडणूक घेणे शक्य नसल्याने प्रक्रिया तूर्त स्थगित करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव येथील ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण महिला एका जागेसाठी पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यासाठी 20 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यन्त 203 उमेदवारी अर्ज दाखल झाले. 25 ऑक्टोबर रोजी छाननीत 155 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. निवडणूक विभागाकडून सर्व उमेदवार यांना चिन्ह ही वाटप झाले होते , 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान आणि 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी असा कार्यक्रम होता.
मात्र, एका इव्हीएम युनिटवर जास्तीत जास्त 14 उमेदवाराची मतपत्रिका बसविण्यात येते.तर एका वेळी जास्तीत जास्त चार बॅलेट पेपरचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे साठ उमेदवाराचीच मतपत्रिका केली जाऊ शकते. त्यामुळे 155 उमेदवारांची संख्या लक्षात घेता निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान प्रक्रियेमध्ये घेता येणे शक्य नाही. तसेच मतदान प्रक्रिया पारंपारिक पद्धतीने राबविण्यासाठी पुरेशा प्रमाणात मोठ्या मतपेट्या उपलब्ध नाहीत.यामुळे निवडणूक प्रक्रिया तूर्त स्थगित करण्यात येत असल्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के कृष्णमूर्ती यांनी 26 ऑक्टोबर रोजी काढले आहेत. एकूणच गावकरांची गांधीगिरी यशस्वी झाली आहे.