गंगाखेड (परभणी ) : सोळा ऊसतोड कामगार व त्यांच्या मुलांना पुजारी तांडा येथे मुकदमाने डांबुन ठेवले असल्याची तक्रार गंगाखेड प्रथम वर्ग न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाच्या सर्च वारंट वरून पोलिसांनी त्या कामगारांची सुटका करून त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले.
गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांडा येथील ऊसतोड मुकादम संजय साहेबराव राठोड (ह.मु. सुरळवाडी तांडा ता.गंगाखेड) यांच्या टोळीत कामाला असलेले ऊसतोड कामगार १) प्रल्हाद साहेबराव राठोड वय २५ वर्ष, २) छाया प्रल्हाद राठोड वय २३ वर्ष, ३) साहेबराव पोमा राठोड वय ६० वर्ष रा.सुरळवाडी ता.गंगाखेड, ४) राम गोपीनाथ चव्हाण वय ३० वर्ष, ५) आशाबाई राम चव्हाण वय २५ वर्ष रा. खळी तांडा ता.गंगाखेड, ६) अंकुश रामचंद्र राठोड वय २८ वर्ष, ७) ताईबाई अंकुश राठोड वय २५ वर्ष, ८) विश्वनाथ रामधन पवार वय ३५वर्ष, ९) सुनीता विश्वनाथ पवार वय ३० वर्ष, रा.शिवाजीनगर तांडा ता.गंगाखेड, १०) अंकुश गोपीनाथ चव्हाण वय २५ वर्ष, ११) लहु गोपीनाथ चव्हाण वय २२ वर्ष रा. खरपी तांडा ता.सोनपेठ, १२) भिमराव राठोड वय ६० वर्ष, १३) अनिता भिमराव राठोड वय ५० वर्ष, १४) उत्तम भिमराव राठोड वय २५ वर्ष, १५) उषा उत्तम राठोड वय २० वर्ष, १६) उज्वला देवानंद राठोड वय २० वर्ष रा.ताजपुर तांडा ता.निलंगा जि. लातुर हे सर्व कामगार व त्यांचे कुटुंबातील लहान मुले पाथरी तालुक्यातील शेंदुरगव्हाण येथील ऊसाच्या फडात कामावर होते.
विस दिवसांपुर्वी शिवाजी माधव चव्हाण वय ५० वर्ष रा. खुदावाडी ता. तुळजापुर यांनी राठोड यांना धमकी देवुन ऊसतोड कामगारांना आपल्या सोबत नेले. तसेच सर्वाना पुजारी तांडा ता. तुळजापुर येथील फडात डांबुन ठेवले. याप्रकरणी राठोड यांनी गंगाखेड न्यायालयात धाव घेत यासंबंधी तक्रार दाखल केली होती. यावरून प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीश यांनी १३ डिसेंबर रोजी सर्च वारंट काढले होते. या ऊसतोड कामगारांचा शोध घेवुन त्यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश त्यांनी गंगाखेड पोलीसांना दिले होते.
यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पो.नि. सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकातील स.पो.उप.नि. मोईन पठाण मास्टर, प्रकाश आघाव, पो.शि. घुगे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे स.पो.उप.नि. एस.एच. तेलंग, पो.ना. व्ही. एच. सुटगुरे यांच्या मदतीने दि.१५ डिसेंबर शुक्रवार रोजी वरील सर्व ऊसतोड कामगार व त्यांच्या सोबत असलेल्या तेरा लहान मुलांची मुकदमाच्या तावडीतुन सुटका करून दि.१६ डिसेंबर शनिवार रोजी त्यांना गंगाखेड न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायाधीश पी.पी. देशमुख यांनी सर्वांना राठोड यांच्या ताब्यात दिले.