गंगाखेड( परभणी) : वकील कॉलनीतील एका व्यक्तीने बांधकाम परवानगी सोबत जोडलेल्या नकाशा प्रमाणे बांधकाम न करता नगर परिषदेच्या जागेत बांधकाम केले. हे बांधकाम अनिधिकृत असून त्यामुळे नगर परिषदेच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात आल्याने या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वकील कॉलनीत राहणाऱ्या कृष्णा नागनाथ पदमवार यांनी त्यांच्या मालकीच्या मालमत्ता क्रमांक ५९ए /३/१ या जागेत बांधकाम करण्याकरिता दि. २०/१०/२०१६ नगर परिषदेकडून बांधकाम परवानगी घेतली. मात्र, मूळ बांधकामात बांधकाम परवाना काढते वेळी सोबत जोडलेल्या नकाशात दर्शविलेल्या जागेव्यतिरिक्त काही बांधकाम करण्यात आले.
हि बाब स्वच्छता निरीक्षक गोपाळ राजेंद्र यांच्या निदर्शनास आली. याबाबत अधिक माहिती घेतली असता नगर परिषदेच्या १४ फ़ुट ६ इंच जागेवर पदमवार यांनी अतिक्रमण करून बांधकाम पूर्ण केल्याचे लक्षात आले. यामुळे दि. २७/०९/२०१७ रोजी नगर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र नगर रचना व अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ व ५४ अन्वये पदमवार यांना नोटीस बजावुन अनधिकृत बांधकाम व न.प. जागेतील अतिक्रमण ३० दिवसाच्या आत काढण्याच्या सुचना दिल्या. परंतु, नोटीस बजावुन ३० दिवस उलटुन गेल्यानंतर ही पदमवार यांनी अतिक्रमण न काढल्याने स्वच्छता निरीक्षक राजेंद्र यांनी सोमवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पदमवार यांच्या विरूद्ध वरील कलमान्वये गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि सुरेश थोरात , बिट जमादार सुलक्षण शिंदे, पो.शि. मिलिंद जोगदंड करीत आहेत.