गंगाखेड (परभणी ) : कर्मचाऱ्याचे कालबद्ध पदोन्नतीचे काम करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नगर परिषद आस्थापना विभागातील कनिष्ठ लिपिक विलास तातोडे यांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. ३ ) दुपारी एक वाजेच्या सुमारास नगर परिषद कार्यालयात करण्यात आली.
गंगाखेड नगर परिषदेत शिपाई लाईनमॅन पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या कालबद्ध पदोन्नतीचे काम करण्यासाठी आस्थापना विभागातील कनिष्ठ लिपिक विलास तातोडे हे एक हजार रुपये लाच मागत असल्याची तक्रार एका कर्मचाऱ्याने लाच लुचपत विभागाच्या परभणी येथील कार्यालयात केली. प्राप्त तक्रारीची पडताडणी करून लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन. जे. शेख, पोलीस उपअधीक्षक भरत हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर, पोलीस निरीक्षक विवेकानंद भारती, जमादार मिलिंद हनुमंते, जमादार जहागीरदार, जमादार शकील, पोलीस नाईक अनिल कटारे, पोलीस नाईक अनिरुद्ध कुलकर्णी, पोलीस शिपाई अविनाश पवार, पोलीस शिपाई सचिन धबडगे, पोलीस शिपाई चौधरी, महिला पोलीस शिपाई सारिका टेहरे, महिला पोलीस शिपाई दंडवते, पोलीस नाईक बोके यांच्या पथकाने आज दुपारी एक वाजेच्या सुमारास नगर परिषद कार्यालयात सापळा लावला.
कनिष्ठ लिपिक विलास तातोडे यांनी लाचेची रक्कम (एक हजार रुपये) स्विकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली होती.