गंगाखेड ( परभणी ) : दुध दरवाढ आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आज दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास परभणी रोडवरील खळी पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर दुध टाकत शासनाचा निषेध केला.
दुधाची दरवाढ, दुध अनुदानाचे वाटप आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज दुपारी खळी पाटीजवळील पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी शासन विरोधी घोषणाबाजी करत रस्त्यावर दुध टाकले. तसेच काही कार्यकर्त्यांनी सोलापुर-रिसोड बस आडवून चाकातील हवा सोडुन देण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाची माहिती मिळताच सपोनि सुरेश थोरात कर्मचाऱ्यांसह आंदोलनस्थळी दाखल झाले. यामुळे अवघ्या दहा मिनिटातच आंदोलन गुंडाळण्यात आले.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष भगवानराव शिंदे, तालुकाध्यक्ष माउली लंगोटे, प्रसिद्धी प्रमुख विष्णुदास भोसले, उद्धव लंगोटे, लक्ष्मणराव त्राफळे, प्रेमराज शिंदे, नागेश शिंदे, गणपतराव शिंदे, नागोराव भंडारे, सखाराम गिरी आदीसह दुध उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग होता.