जिल्ह्यात वाढली दारूची अवैध विक्री
परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दारूची अवैध विक्री वाढली आहे. गावागावात रात्रीच्या वेळी अवैध मार्गाने दारु पोहोचती केली जात आहे. पोलीस प्रशासनाने या दारूविक्री विरुद्ध कारवाई केली असली तरी प्रत्यक्षात अवैध विक्रीला आळा बसलेला नाही.
बाजारात प्लास्टिक कॅरीबॅग सर्रास वापर
परभणी : राज्यात प्लास्टिकच्या वापराला बंदी असतानाही शहराच्या बाजारपेठेत मात्र प्लॅस्टीकच्या कॅरीबॅगचा वापर केला जात आहे. मनपा प्रशासनाने कॅरीबॅग विरोधी मोहीम बंद केली असून, प्लास्टिकचा वापर पुन्हा वाढला आहे.
अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळे
परभणी : येथील निरज हॉटेल ते अण्णा भाऊ साठे चौक या रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमणे वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने येणारे नागरिक याच रस्त्याने वाहतूक करतात. त्याचप्रमाणे या मार्गावर खाजगी दवाखाने आहेत. त्यामुळे या अतिक्रमणांचा त्रास रुग्णांच्या नातेवाईकांनाही सहन करावा लागत आहे.
जायकवाडी कालव्याची दूरवस्था
परभणी : जिल्ह्यातून वाहणाऱ्या जायकवाडीच्या डाव्या कालव्याची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. या कालव्याची फरशी उघडली असून, काही भागात गेटही तुटलेले आहेत. तसेच कालव्यात अनेक भागांमध्ये गाळ साचला आहे. पाटबंधारे विभागाने या कालव्याची दुरुस्ती करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
मुख्य रस्त्यावरील डीपी बनली धोकादायक
परभणी : येथील नारायणचाळ रस्त्यावर जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसमोर बसविलेली डीपी धोकादायक बनली आहे. या डीपीचे दरवाजे सताड असून वाहनधारकांना विजेचा धक्का लागून दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन डीपीला दरवाजे व कुलूप बसवावेत, अशी मागणी होत आहे.
छुप्या प्रचारावर उमेदवारांचा भर
परभणी : ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार थांबला असून, आता उमेदवारांनी छुप्या प्रचारावर भर दिला आहे. मतदारांनी मताचे दान आपल्याच झोळीत टाकावे, यासाठी मनधरणी केली जात आहे. जाहीर प्रचार थांबला असला तरी छुप्या मार्गाने मतदारांना अमिषे दाखविली असून, मतदानाच्या दिवशी आपल्याच पॅनलच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.