नदीवरील पुलाचे काम संथगतीने
परभणी : पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील पूर्णा नदीवरील पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. मागील वर्षभरापासून हे काम सुरू आहे. सध्या पुलाचे केवळ पिलर उभे करण्यात आले आहेत. त्यापुढे काम सरकले नाही. विशेष म्हणजे, याच परिसरात जुना पूल असून, या पुलालगत पाणी टेकत आहे. अधिक उंचीचा पूल नसल्याने डिग्रस बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठा करताना अडचणी निर्माण होत आहेत.
जिल्ह्यात वाढले उसाचे क्षेत्र
परभणी : जिल्ह्यात यावर्षी सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असून, प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असून, या पाण्याच्या भरवश्यावर बागायती पिकांचे क्षेत्र वाढले आहे. त्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी ऊस पिकालाच प्राधान्य दिल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी उसाचे क्षेत्र वाढले आहे.
शासकीय कार्यालयातच स्वच्छतेला फाटा
परभणी : येथील प्रशासकीय इमारत परिसरातील शासकीय कार्यालयांमध्येच स्वच्छतेला फाटा देण्यात आला आहे. या इमारतीतील कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. त्याचप्रमाणे पान खाऊन भिंती रंगलेल्या असून, त्याच्या स्वच्छतेकडे अधिकारी कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्याला स्वच्छतेचे धडे देणाऱ्या शासकीय कार्यालयांच्या अंगणातच अस्वच्छता निर्माण झाली आहे.
जिल्हा कचेरीत वाहनांचा गराडा
परभणी: येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच वाहनांचा गराडा लागत आहे. विशेष म्हणजे नो पार्किंगचा फलक लावलेल्या जागेवरच बिनधास्तपणे वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे कार्यालयात प्रवेश करताना नागरिकांना वाहनांचा अडथळा दूर करुन प्रवेश मिळवावा लागत आहे.
रेल्वेस्थानकावर वाढली प्रवाशांची गर्दी
परभणी : रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्यांची संख्या वाढविली असून, आरक्षण करुनच रेल्वेचा प्रवास करता येणार आहे. रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्याने प्रवाशांचीही आता गर्दी होऊ लागली आहे. मात्र रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या तापमान तपासणीला खो देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
रस्त्यांच्या कामाला निधीचा अडसर
परभणी : जिल्ह्यात प्रमुख रस्त्यांसह ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने निधीची मागणी नोंदविली असली तरी शासनाने निधी पुरवठा केला नाही. त्यामुळे सध्या तरी रस्ता विकासाची कामे ठप्प असून, वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यानेच प्रवास करावा लागत आहे.