येलदरी : तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने पूर्णा नदीवरील तिन्ही धरणे तुडूंब भरले आहेत. यामुळे खडकपूर्णाधरणाचे 19, येलदरी धरणाचे 10 तर सिद्धेश्वर धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तीनही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग पूर्णा नदी पात्रात होत असल्याने नदीला पूर आला आहे. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे येलदरी धरण 100 टक्के भरले आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे प्रशासनाने सोमवारी (दि.17) रात्री 1:15 वाजता येलदरी धरणाचे सर्व 10 दरवाजे अर्धा मीटरने उघडली. धरणातून 16800 क्यूसेकने पूर्णा नदीत विसर्ग सुरू आहे. त्यामुळे येलदरी धरणाखालील पूर्णा नदीला पूर आला आहे.
खडकपूर्णा धरणाच्या 19 दरवाज्यातून 22500 क्यूसेक पाणी पूर्णा नदीत सोडल्या मुळे येलदरी धरणात आवक वाढली आहे. धरण 100 टक्के भरले असून पूर नियंत्रण करण्यासाठी आज दि. 17/08/2020 रोजी सकाळी 10.30 वाजता धरणाचे गेट नं.3&8(0.5 m) ने वाढवून एकूण 10 Radial gate (Gate no.2,4,7 & 9) 0.5 m आणि (Gate no.1,3,5,6,8&10) 1 m करून नदीपात्रात 30139.14Cusec (853.45cumec) एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे किंवा कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.
पूर स्थिती निर्माण होण्याची शक्यतापूर्णा प्रकल्पाच्या तिन्ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत असल्यामुळे अनेक ठिकाणी पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे. नदी काठच्या गावांतील ग्रामस्थांनी सावध राहावे असे आवाहन अधीक्षक अभियंता एस के सब्बीनवार यांनी केले आहे.