परभणी : शहरातील काद्राबाद प्लॉट परिसरात एका युवकाच्या ताब्यातून दहशतवादविरोधी शाखेच्या पथकाने गावठी कट्टा जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण्यात आली. यामध्ये एकूण दोन जणांचा समावेश असल्याने त्यांच्याविरुद्ध नानलपेठ ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद केला.
एटीसीचे कर्मचारी किशोर चव्हाण यांनी फिर्याद दिली. प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक ए. एस. कुरुंदकर यांच्या आदेशाने सहायक पोलिस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, किशोर चव्हाण, जावेद खान, शेख अबुजर, इमरान खान पठाण हे निवडणूकसंबंधी गोपनीय माहिती काढण्यासाठी शहरात गस्त घालत होते. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काद्राबाद प्लॉट भागात एका हॉटेलसमोर एक इसम येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावरून दोन पंचांना सोबत घेत इसमाचा शोध सुरू होता.
दरम्यान, संशयावरून एकाची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्टल मिळाले. चौकशीत त्याने सय्यद अमन सय्यद जफर (१९) असे नाव सांगितले. त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचेही स्पष्ट झाला. त्यावरून पंचाच्या उपस्थितीत पिस्टल जप्त केले. त्याने हे शस्त्र शेख सद्दाम शेख हानीफ (२४) याच्याकडून मिळविल्याचे सांगितले. त्यावरून नमूद दोघांविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३-२५ प्रमाणे फिर्याद दाखल केली.