लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पंचायतराज समितीपुढे साक्ष देण्यासाठी अधिकारी गेल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेची बुधवारी आयोजित केलेली सर्वसाधारण सभा बारगळली आहे़जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते़ या संदर्भातील नोटिसा सर्व सदस्यांना प्रशासनाच्या वतीने पाठविण्यात आल्या होत्या़ त्यानुसार काही सदस्य तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, सीईओ बी़पी़ पृथ्वीराज व अन्य काही अधिकारी बुधवारी दुपारी २ च्या सुमारास सभागृहात येऊन बसले़ परंतु, नियमित एकही अधिकारी किंवा बहुतांश सभापती उपस्थित नव्हते़यावेळी भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य डॉ़ सुभाष कदम यांनी सभा सुरू करण्याची मागणी केली; परंतु, गणपूर्ती होत नसल्याने ही सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले़ पंचायतराज समितीपुढे साक्ष देण्यासाठी बहुतांश अधिकारी मुंबईला गेले आहेत़त्यामुळे सभा तहकूब करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले़ ही माहिती अगोदर का दिली नाही ? असा सवाल करून डॉ़ कदम यांनी उपस्थितांना चांगलेच धारेवर धरले़ यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास जोगदंड यांनीही प्रशासकीय कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली़ त्यानंतर डॉ़ कदम यांची इतर पदाधिकाऱ्यांनी समजूत काढली़ आता पुढील आठवड्यात ही सर्वसाधारण सभा घेण्यात येईल, असे सांगण्यात आले़त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य विष्णू मांडे यांच्यासह अन्य काही सदस्य जिल्हा परिषदेत दाखल झाले़ त्यांनीही जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामकाजाविषयी संताप व्यक्त केला़जिल्हा नियोजनच्या निधी वाटपाचेच मुख्य कारणअधिकारी पंचायतराज समितीपुढे साक्ष देण्यासाठी मुंबईला गेल्याचे कारण सांगून सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली असली तरी खरे कारण मात्र जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचे असल्याचे समजते़ जिल्हा नियोजन समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत काही सदस्यांनी त्यांच्या मतदार संघात कोणत्या हेड अंतर्गत किती निधी वाटपाच्या शिफारशी आल्या? याचा जाब विचारला़ सदस्यांनाच अंधारात ठेऊन परस्पर निर्णय घेतला जात असेल तर तो सहन केला जाणार नाही, असे काही सदस्यांनी सांगितले़ त्यावर पालकमंत्र्यांनी जि़प़ सदस्यांमधील अंतर्गत वाद अगोदर मिटवा़ त्यानंतर निधी वितरणाच्या याद्या द्या, असे सांगितले़ ही यादीच काही सदस्यांपुढे येऊ द्यायची नाही, या हेतुने चर्चाच नको म्हणून तूर्त सर्वसाधारण सभा पुढे ढकलल्याचे समजते़ अधिकारी १९ सप्टेंबरला मुंबईला असणार आहेत? हे माहिती असूनही १९ सप्टेंबर रोजीच सर्वसाधारण सभा का ठेवली? असा सवाल सदस्यांकडून विचारण्यात आला. तसेच या पूर्वी २० जून रोजी सर्वसाधारण सभा झाली होती. त्याला २९ सप्टेंबर रोजी २ महिने २९ दिवसांचा कालावधी पूर्ण होतो़ तीन महिन्यांत सभा घेणे बंधनकारक आहे़ या सर्व बाबी ध्यानात घेऊन सभेची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी १९ सप्टेंबरच्या सभेचे पत्र काढण्यात आले होते, अशी माहिती सदस्यांनी दिली. विशेष म्हणजे २० जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचा अनुपालन अहवाल अद्यापही सदस्यांना मिळाला नाही, असेही जि़प़ सदस्य डॉ़ सुभाष कदम, विष्णू मांडे, श्रीनिवास जोगदंड यांनी सांगितले़ त्यामुळे आता पुन्हा एकदा जि़प़ सदस्यांमधील निधी वाटपाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे़
परभणी जि़प़ची सर्वसाधारण सभा बारगळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:56 AM