परभणी- येथील महानगरपालिकेची आज होणारी सर्वसाधारणसभा आयुक्त राहुल रेखावार हे मुंबई येथे बैठकीसाठी गेल्याने तहकूब करण्यात आली. पुढील सभेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले.
महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मनपाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ३२ विषयांवर चर्चा होणार होती. त्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे शहरातील एमआयडीसी भागातील शहर विकास निधीतील सर्वे क्रमांक २५ मधील १६ एकर ३० गुंठे क्षेत्र विद्यमान औद्योगिक विभागातून वगळून ते रहिवाशी विभागात समाविष्ट करण्याचा विषय होता. तसेच महानगरपालिकेत गतवर्षी झालेल्या ७२ लाख रुपयांच्या वीज बिल घोटाळ्यावरही चर्चा होणार होती. याशिवाय काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एका स्वीकृत सदस्याची निवड घोषित करणे, नवीन दलित वस्त्यांची घोषणा करणे आदी विषयांवर चर्चा होणार होती; परंतु, मनपा आयुक्त राहुल रेखावार हे बुधवारी बैठकीसाठी मुंबईला निघून गेले. त्यामुळे महापौर मीनाताई वरपूडकर यांनी ही सहभाग तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, आज सर्वसाधारण सभा होणार असल्याने सकाळी ११ च्या सुमारास मनपाच्या बी़ रघुनाथ सभागृहात ८ ते १० नगरसेवक उपस्थित होते़ त्यांना याबाबत उशिरा माहिती मिळाली़ परंतु, मंगळवारी रात्रीच बुधवारची सभा होणार नसल्याचे निश्चित झाले असल्याचे समजते.