लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागील सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर तब्बल महिनाभराने सोमवारी होत असलेली मनपाची सर्वसाधारण सभा यावेळीही गाजणार असल्याची चिन्हे आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ठरवून दिलेल्या स्वीकृत सदस्यांची निवड होते की नाही, याकडेही लक्ष लागले आहे.३ नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेची सर्वसाधारण आयोजित केली होती. या सभेत पाणीपुरवठा, इमारत दुरुस्तीसाठी २५ लाखांची तरतूद यासह इतर १६ विषय चर्चेसाठी ठेवले होते.तसेच काँग्रेसच्या तीन स्वीकृत सदस्यांची निवड या सभेमध्ये होणार होती. मात्र स्वीकृत सदस्यपदासाठी पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या उमेदवारांविषयी नाराजी व्यक्त करीत ही सभा कोरम पूर्ततेअभावी तहकूब झाली होती. त्यानंतर आता ४ डिसेंबर रोजी या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता बी.रघुनाथ सभागृहात ही सर्वसाधारण सभा होणार आहे. मागील सभेतील विषयांबरोबरच १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून साहित्याची खरेदी, अमृत पाणीपुरवठा योजनेचा लोकवाटा भरण्यासाठी २० कोटी रुपयांचे कर्ज घेणे, घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविणे अशा विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी निश्चित केलेल्या स्वीकृत सदस्यांची निवड होते की नाही, याकडे देखील लक्ष लागले आहे. ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरातील मैदानाचे आरक्षण उठवावे, हा मुद्दाही चर्चेला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठरावाकडेही लक्ष लागले आहे. या शिवाय वाढीव घरपट्टी, वीज बिल घोटाळा असे अनेक प्रश्न असून त्यावर काय चर्चा होते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
परभणी महापालिकेची आज सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:42 AM