परभणी : महानगरपालिकेच्या चार स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी बोलाविण्यात आलेली सर्वसाधारण सभा अपेक्षेप्रमाणे तहकूब करण्यात आली आहे. आयुक्त राहुल रेखावार हे सभागृहात उशिरा आल्याच्या कारणावरुन बाहेर गेलेले काही सदस्य सभागृहातच परतले नसल्याने कोरमअभावी ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा निर्णय महापौर मीनाताई वरपूडकर यांनी घेतला.
परभणी महानगरपालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता असताना तीन स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरुन दोन दिवसांपासून पक्षातील अंतर्गत वाद वाढला आहे. गुरुवारी पक्षश्रेष्ठींनी सूचविलेल्या तीन स्वीकृत सदस्यासाठीच्या नावांपैकी काही नावांना स्थानिक नगरसेवक व पदाधिकाºयांनी विरोध दर्शविल्याने गुरुवारी दिवसभर मनपातील राजकारण चांगलेच तापले होते. गुरुवार तिन्ही इच्छुकांचे गटनेत्यांमार्फत प्रक्रिया पूर्ण करुन अर्ज दाखल केल्यानंतर शुक्रवारी आयोजित सर्वसाधारण सभेत निवड जाहीर करण्यात येणार होती. परंतु, ही सर्वसाधारण सभा तहकूब करुन पुढे ढकलावी, असा सूर काही नगरसेवकांनी गुरुवारी आवळला होता. काहींनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी कोरे लेटरपॅडही जमविण्यात आले. परंतु, राजीनामा कोणीही दिला नाही.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ९ वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार बी.रघुनाथ सभागृहात सकाळी ९ वाजता महापौर मीनाताई वरपूडकर, उपमहापौर माजूलाला, नगरसचिव मुकुंद कुलकर्णी दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे गटनेते भगवान वाघमारे हेही दाखल झाले. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक महेमुद खान, सचिन देशमुख, खमीसा जान महमद जानू, राष्ट्रवादीचे गटनेते जलालोद्दीन काजी, नगरसेवक बाळासाहेब बुलबुले, अमोल पाथरीकर, शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे, भाजपाच्या गटनेत्या मंगल मुद्गलकर, नगरसेवक मोकिंद खिल्लारे या १२ नगरसेवकांची उपस्थिती होती. सभागृह सुरु झाल्यानंतर पाच ते सात मिनिटांनी उशिराने आयुक्त राहुल रेखावार दाखल झाले. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते जलालोद्दीन काजी यांनी आयुक्त रेखावार हे उशिरा सभागृहात का? आले, हा सभागृहातील सदस्यांचा अवमान आहे, असे सांगून त्यांचा निषेध नोंदवित ते सभागृहातून बाहेर गेले. त्यांच्या पाठोपाठ अन्य सदस्यही सभागृहातून निघून गेले. त्यामुळे महापौर मीनाताई वरपूडकर यांनी १५ मिनिटांसाठी सभा तहकूब केली. त्यानंतरही बहुतांश सदस्य सभागृहात आले नसल्याने गणपूर्तीअभावी शुक्रवारची सर्वसाधारण सभा तहकूब करीत असल्याचे वरपूडकर यांनी जाहीर केले. पुढील सभेची तारीख नंतर घोषित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे शुक्रवारची सर्वसाधारण सभा तहकूब झाली.
सभागृहात फक्त १२ नगरसेवक उपस्थितसभागृहात एकूण सदस्यांची संख्या ६५ आहे. त्यापैकी महापौर, उपमहापौर यांच्यासह फक्त १२ सदस्यांनी उपस्थितीपटावर स्वाक्षरी केली. त्यामुळे ६५ पैकी तब्बल ५३ नगरसेवकांनी सभागृहात जाण्याचे टाळले. मनपात काँग्रेसचे ३२ सदस्य आहेत. त्यापैकी फक्त ६ सदस्य सभागृहात उपस्थित होते. राष्ट्रवादीचे १८ सदस्य सभागृहात असताना फक्त ३ सदस्य उपस्थित होते. विरोधी पक्षनेते विजय जामकर हे स्वत: सभागृहात उपस्थित नव्हते. शिवसेनेचे सहा सदस्य असताना पक्षाचे गटनेते चंदू शिंदे यांच्यासह पाच सदस्य गैरहजर होते. केवळ अमरदीप रोडे हे एकमेव सदस्य उपस्थित होते. भाजपाचे ८ सदस्य असताना केवळ २ सदस्यच सभागृहात उपस्थित होते.
काँग्रेस सदस्यांमध्ये स्वीकृत सदस्य पदावरुन झालेल्या वादातून काही नगरसेवक गैरहजर राहतील, अशी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर या पक्षाचे तब्बल २६ नगरसेवक गैरहजर राहिले. परंतु, विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपाचे सदस्य सभागृहात का गैरहजर राहिले, असा सवाल परभणीकरांना पडला आहे. मनपात गुरुवारी दिवसभर त्यानंतर रात्री घडलेल्या घडामोडींमध्ये काही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पडद्यामागे राहून सत्ताधाºयांना मदत करण्याची भूमिका घेतल्याचीही चर्चा मनपा वर्तुळात होताना दिसून आली. पक्षीय विचार व बंधने झुगारुन ही युती कशी काय झाली, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
आयुक्तांचे उशिरा येणे ठरले निमित्तमनपा आयुक्त राहुल रेखावार सभागृहात ५ मिनिटे उशिराने आले. विरोधी पक्षाच्या म्हणण्यानुसार ते १५ मिनिटे उशिरा आले. आयुक्त उशिरा आल्याने सभागृहातील उपस्थित सदस्यांचा अवमान झाला. त्यामुळे सभात्याग केला व गणपूर्तीअभावी सभा तहकूब करण्यात आली, हा घटनाक्रम सदस्यांनी सांगितला असला तरी पडद्यामागे अनेक घटना घडल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सुचविलेल्या नावांपैकी काही नावांना स्थानिक नगरसेवक व पदाधिकाºयांचा विरोध असल्याने जाहीरपणे असा विरोध न दर्शविता पडद्यामागे खेळी खेळल्याची चर्चा होत आहे. आयुक्त रेखावार हे जरी १५ मिनिटे उशिरा आले असले तरी सभागृह सुरू होऊ शकले असते, कारण सभागृहात महापौर, उपमहापौर, नगरसचिव उपस्थित होते. परंतु, तसे झालेच नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींचा निर्णय काँग्रेसच्या नगरसेवकांना मान्य नाही की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता भविष्यकाळात पक्षश्रेष्ठींनी सुचविलेली नावेच कायम राहतात की बदलली जातात, हेही पाहणे रंजक ठरणार आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी सुचविलेली नावे हेच प्रमाण माणून ती अंतिम केली जाण्याची आतापर्यंतची पद्धत आहे. आता ही पद्धत खंडित होऊन स्थानिक नगरसेवकांच्या मर्जीप्रमाणे पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार की आपल्या निर्णयावर ठाम राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शहराचे प्रश्न राहिले अधांतरीचशुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत जवळपास ५ ते ७ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या प्रश्नांना मंजुरी देण्यात येणार होती. शिवाय शहराचा पाणीपुरवठा, वीज बिल घोटाळा, शहरातील अंतर्गत रस्त्याची झालेली दुरवस्था इ. विषयांवर सभागृहात चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु, सर्वसाधारण सभा झाली नसल्याने हे प्रश्न अधांतरीच राहिले. विरोधी पक्षाकडून हे प्रश्न उपस्थित होणे अपेक्षित असताना विरोधी पक्षातील सदस्यच सभागृहात आले नसल्याने सत्ताधारी कोण? आणि विरोधक कोण? हेच न उलगडणारे कोडे असल्याचे दिसून आले.
शहराचे प्रश्न राहिले अधांतरीचशुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत जवळपास ५ ते ७ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या प्रश्नांना मंजुरी देण्यात येणार होती. शिवाय शहराचा पाणीपुरवठा, वीज बिल घोटाळा, शहरातील अंतर्गत रस्त्याची झालेली दुरवस्था इ. विषयांवर सभागृहात चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु, सर्वसाधारण सभा झाली नसल्याने हे प्रश्न अधांतरीच राहिले. विरोधी पक्षाकडून हे प्रश्न उपस्थित होणे अपेक्षित असताना विरोधी पक्षातील सदस्यच सभागृहात आले नसल्याने सत्ताधारी कोण? आणि विरोधक कोण? हेच न उलगडणारे कोडे असल्याचे दिसून आले.
सभागृहाबाहेर नगरसेवक व नातेवाईकांची गर्दीमनपाच्या बी.रघुनाथ सभागृहाबाहेर विविध पक्षांचे नगरसेवक व महिला नगरसेवकांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर उपस्थित असल्याचे दिसून आले. सभागृहाबाहेर असलेले नगरसेवक सभागृहात का गेले नाहीत, हा वेगळाच चर्चेचा विषय आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रियेसंदर्भात गटनेते भगवान वाघमारे यांच्याशी तीन वेळा मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिवाय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा चार ते पाच वेळा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाची याबाबत भूमिका समजू शकली नाही.
शहरवासियांच्या जीव्हाळ्याचे विषय आयुक्तांकडे देऊनही ते विषय पत्रिकेवर घेण्यात आले नाहीत. त्यामुळे शहरवासियांच्या प्रश्नांवर चर्चाच होणार नसल्याने भाजपाचे काही सदस्य सभागृहात आले नाहीत. - मंगल मुद्गलकर, भाजपा गटनेत्या
शहरातील संभाव्य मालमत्ता करवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत, व्यापा-यांकडून चुकीच्या पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसुली केली जात आहे. शिवाय वीज बिल घोटाळा इ. महत्त्वाचे विषय पत्रिकेत समाविष्ट केले नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या सदस्यांची नाराजी असल्याने ते सभागृहात आले नाहीत. आपणास सभागृहात येण्यास थोडासा उशीर झाला.- चंदू शिंदे, गटनेता शिवसेना
सर्वसाधारण सभेस सदस्य वेळेत उपस्थित होते. परंतु, खुद्द आयुक्त राहुल रेखावार १५ मिनिटे उशिराने आले. काही विभागप्रमुख गैरहजर होते. त्यामुळे सभागृहातील सदस्यांचा अवमान झाला. शिवाय दिलेले विषय पत्रिकेवर घेतले नाहीत. त्यामुळे सभागृहाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला.- जलालोद्दीन काजी, गटनेता राष्ट्रवादी काँग्रेस