परिवहन विभाग अधिक हायटेक करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय पातळीवरून विविध उपययोजना करण्यात येत आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत अशा धोरणाचा अवलंब करून नागरिकांना ऑनलाईन सेवा देण्यावर भर देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून परिवहन विभागाने नागरिकांना आता घरबसल्या वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. सारथी ४.० या अद्ययावत प्रणालीअंतर्गत अर्जदाराला संबंधित संकेतस्थळावर आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. त्यानंतर अर्जदाराची सर्व माहिती परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाला कोटा देण्यात आला आहे. त्यानुसार दुचाकी व चारचाकी वाहन परवाना देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.
नवीन वाहनाची प्रथम नोंदणी वितरकांकडूनच
नवीन वाहनाची नोंदणी प्रथम वितरकांकडून करण्यात येणार आहे. वितरकांकडून सर्व कागदपत्रांची डिजिटल सिग्नेचर पद्धतीचा उपयोग करून ती आरटोओ कार्यालयास सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष या अनुषंगाने कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. वाहन वितरकांनी कर व शुल्क भरल्यानंतर वाहनाचा क्रमांक देण्यात येणार आहे.
कोरोनामुळे ऑनलाईन सुविधा देण्याच्या दृष्टीकोनातून ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी नवीन वाहन नोंदणीकरिता मोटार वाहन निरीक्षक यांच्यामार्फत करण्यात येणाऱ्या तपासणीच्या प्रक्रियेला आता खो देण्यात आला आहे. या सेवेमुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाचणार आहे. परिणामी ही सेवा नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
वाहन धारकांची गैरसोय होणार दूर
वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी नागरिकांना यापूर्वी आरटीओ कार्यालयात सातत्याने चकरा माराव्या लागत होत्या. यामध्ये संबंधितांचा पैसा व वेळ मोठ्या प्रमाणात वाया जात होता. आता ही सुविधा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याने नागरिकांची गैरसोय टळणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
... तर जावे लागेल
आरटीओ कार्यालयात
ज्या व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना काढायचा आहे, त्याच्याकडे आधार क्रमांक नसेल तर किंवा ऑनलाईन परीक्षा द्यायची नसेल तर त्यांना कार्यालयात जाऊन या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत
असा करा ऑनलाईन अर्ज
परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर संबंधितांना शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर आधार क्रमांकाची पडताळणी केली जाणार आहे.
त्यानंतर उमेदवाराची सर्व माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर कोणत्या वाहनासाठी वाहन चालविण्याचा परवाना लागेल यांची माहिती द्यावी लागेल.
त्यानंतर शारीरिकदृष्ट्या उमेदवार सक्षम असल्याची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर घरबसल्या चाचणी देता येणार आहे.