परभणी : जिल्ह्यातील सातही नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, या प्रभाग रचनेचा प्रस्ताव ३ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, पूर्णा, पाथरी व मानवत या सहा नगरपालिकांचा कालावधी २९ डिसेंबर रोजी संपला असून, सोनपेठ नगरपालिकाचा कालावधी ६ जानेवारी रोजी संपणार आहे. या सातही नगरपालिकांवर सध्या प्रशासक आहेत. कोरोनामुळे झालेली दिरंगाई व ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न या बाबींमुळे नगरपालिकांच्या निवडणुका वेळेत होऊ शकल्या नाहीत.
कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला आहे. तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न न्यायालयीन पातळीवर प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार सातही नगरपालिकांच्या प्रभाग रचनांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव, त्यामध्ये प्रभागांची संख्या, प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती-जमातीची २०११ च्या जनगणनेुसार लोकसंख्या, क्षेत्र सीमांकन, नकाशा आदींच्या माहितीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकारी सादर करणार आहेत. त्यानंतर ७ मार्च रोजी जिल्हाधिकारी या प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणार आहेत. हा प्रस्ताव १० मार्च रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यानंतर १७ मार्चपर्यंत यावर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. प्राप्त हरकतींवर २२ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतर २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी ब वर्गाच्या नगरपालिकांचा अहवाल अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयोगाकडे, तर क वर्गाच्या नगरपालिकांचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणूक आयुक्त १ एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणार आहेत. ५ एप्रिल रोजी या संदर्भातील अंतिम अधिसूचना जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.
एप्रिलमध्ये निवडणुका होणारराज्याचे निवडणूक आयुक्त १ एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिल्यानंतर, या संदर्भातील अधिसूचना ५ एप्रिल रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर लागलीच निवडणुकीची घोषणा निवडणूक विभागाकडून होऊ शकते. त्यामुळे आगामी नगरपालिकांच्या निवडणुका एप्रिल महिन्यात होणे निश्चित झाले आहे.