साळापुरी व परिसरात मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायत स्तरावरील रोजगार हमी योजनेची कामे बंद आहेत. शिवाय अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतमजुरांना शेतातही काम मिळेनासे झाल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले साळापुरी येथील शेतमजूर राजेभाऊ गोविंद भालेराव (वय ३०) यांनी वयोवृद्ध आईचा वैद्यकीय खर्च, लहान मुलांचा शैक्षणिक खर्च आणि कौटुंबिक गाडा कसा चालवायचा, विवंचनेतून १६ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. घरातील कुटुंबप्रमुखानेच आत्महत्या केल्याने विधवा आई, पत्नी, मुलगी (७ वर्षे), मुलगा (४ वर्षे) व भाऊ असा भालेराव परिवार संकटात सापडला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक गणेशराव घाटगे यांनी भालेराव कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधून दोन्ही मुलांच्या शिक्षणाची व मुलीच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारली. तसेच भविष्यात भालेराव कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.
मयत शेतमजुराच्या मुलांच्या शिक्षणाची घाटगे यांनी घेतली जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:21 AM