परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची सांगता झाल्यानंतर भाजपच्या आ. मेघना बोर्डीकर यांनी ‘सत्ताधाऱ्यांची नौटंकी आटोपली’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
आ. मेघना बोर्डीकर म्हणाल्या, दोन दिवसांपूर्वीच मी पत्रकार परिषद घेऊन हे आंदोलन म्हणजे तिघाडी सरकारमधील सत्ताधाऱ्यांची नौटंकी असल्याचे म्हटले होते. ते आज खरे ठरले. शासकीय महाविद्यालयासाठी लागणारे आठशे कोटी रुपये आणायचे कोठून? असा प्रश्न शिष्टमंडळासमोर उपस्थित करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भातली मानसिकता स्पष्ट केली आहे. असे असताना सुरू असेलेले आंदोलन म्हणजे परभणीकरांची शुद्ध फसवणूक असल्याचे आ. बोर्डीकर यांनी म्हटले आहे. परभणीला मेडिकल कॉलेज झालेच पाहिजे, ही प्रत्येक परभणीकरांची रास्त मागणी आहे. तेव्हा राज्य सरकारमधील जिल्ह्याच्या लोकप्रतिधींनी सरकारकडे पाठपुरावा करावा. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची जवाबदारी आपण स्वीकारत असल्याचेही आ. मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.