परभणी : जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच ४ ते ५ दिवसांपूर्वी जन्मलेली एक नकोशी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नकोशीस अति दक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या शेजारुन जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक छोटे बाळ पडले असल्याचे रुग्णालयातील एका सफाई कामगाराच्या निदर्शनास आले. सकाळी साधारणत: ७ वाजेच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर सफाई कामगारांनी ही माहिती रुग्णालय परिसरातील पोलीस चौकीत दिली.
पोलीस कर्मचाऱ्यांनी चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक संदीप बेंडसुरे यांना माहिती दिल्यानंतर चाईल्ड लाईनचे कृष्णा फुलारी, संदीप गडगिळे हे घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक सचिन द्रोणाचार्य, पोहेकॉ. मुंडे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन या चिमुकल्या अर्भकास जिल्हा सामान्य रुग्णालयातील अति दक्षता शिशू विभागात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचार करण्यात आले असून सध्या या मुलीची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने नानलपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.