लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी:तालुक्यातील खेर्डा येथे तापाची साथ पसरली आहे़ दररोज ५० पेक्षा अधिक तापीचे व चिकन गुनियाचे रूग्ण खाजगी दवाखान्यात दाखल होत आहेत़ यातील ११ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान २६ डिसेंबर रोजी मृत्यू झाल्याने रूग्णांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़पाथरी तालुक्यातील हादगाव बु़ प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गंत खेर्डा येथे अचानक चिकन गुनिया तापीच्या आजारात वाढ झाली आहे़ पाथरी येथील खाजगी रूग्णालयात मागील चार दिवसांपासून रूग्ण दाखल होत आहेत़ यामध्ये गावातील श्रद्धा ज्ञानेश्वर आम्ले या मुलीसही ताप आली होती. तिला उपचारासाठी पाथरी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. खाजगी दवाखान्यात उपचार करुन २६ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास परभणी येथे उपचारासाठी हलविले होते. परंतु, श्रद्धा आम्ले या मुलीचा मृत्यू झाला. गावामध्ये तापीची साथ पसरल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी खंदारे यांनी घटनास्थळीे भेट दिली. हादगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.जाधव यांच्यासह चार पथके गावामध्ये दाखल झाली असून मलेरिया विभागाचे पथकही दाखल झाले आहे. या पथकामार्फत सर्व्हेक्षण आणि आबेटिंग केली जात असून आरोग्य विभागाने डेंग्यूसाठी १० रक्त नमुने घेतले आहेत. तसेच चिकुन गुणियासाठी ६ तर मेंदू ज्वरासाठी ६ नमुने घेतले आहेत. या नमुन्याचा अहवाल तीन दिवसात प्राप्त होणार आहे. तापीच्या आजाराने मृत्यू झालेल्या श्रद्धा आम्ले या मुलीच्या औषधोपचाराचे अहवाल औरंगाबाद येथे पाठविण्यात आले असून नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे समजू शकेल, अशी माहिती जिल्हा आरोग्य डॉ.खंदारे यांनी दिली.खेर्डात किटकशास्त्रीय सर्वेक्षणखेर्डा येथे तापीची साथ उद्भवल्यानंतर आरोग्य पथक दाखल झाले असून, २७ डिसेंबर रोजी संपूर्ण गावाचे किटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले़ त्यात गावातील हाऊस इंडेक्स २६़६६ एवढा आढळला़ आरोग्य पथकाने २२ रक्त नमुने घेतले असून, १२ नमुने पुणे येथे तर १० नमुने परभणी येथे तपासणीसाठी पाठविले आहेत़ गावात कोरडा दिवस पाळण्याच्या सूचना दिल्या जात असून, धूर फवारणीही सुरू आहे़ आरोग्य विभागाने हे गावात तापीचा उद्रेक झाल्याचेही जाहीर केले आहे़
परभणी जिल्ह्यात तापामुळे मुलगी दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:35 AM