परभणी : पुरोहितांना एकाच मोर्चात दरमाह ५ हजार रुपये मानधन देणार असाल तर संपूर्ण आयुष्य कुटुंबासह शेतीमध्ये राबणाऱ्या बळीराजालाही दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी येथे झालेल्या बहुजन जागृती समता मेळाव्यात बोलताना केली.
परभणी येथील डीएसएम कॉलेजच्या मैदानावर अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने बहुजन जागृती समता मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूजबळ बोलत होते. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी ५४ मोर्चे काढावे लागले. तेव्हा कुठे आरक्षण मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० टक्के आरक्षण सवर्ण समाजातील गरिबांना जाहीर केले आहे, त्यांचे कधी मोर्चे निघाले होते. काही दिवसांपूर्वी मुंबईतही पुरोहितांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर त्यांनीच त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याचे सांगितले होते. त्यात पुरोहितांना दरमाह ५ हजार रुपये मानधन देण्यात देणार असल्याच्या मागणीचा समावेश असल्याचे समजते. पौरोहित्य हा काही नियमित व्यवसाय नाही तो काही कालावधीसाठी करण्यात येणारा जोडधंदा आहे. त्यामुळे त्यांना दरमाह ५ हजार रुपये मानधन देणार असाल तर संपूर्ण आयुष्य कुटुंबासह मातीत राबराबून खर्ची घालणाऱ्या बळीराजालाही दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या, त्यांना पैसे देता अन् बाकीच्यांना नाहीत म्हणून सांगता, असे कसे चालेल, असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांची तर व्यासपीठावर आ.विजय भांबळे, माजीमंत्री सुरेश वरपूडकर, माजी खा. गणेश दुधगावकर, आ.रामराव वडकुते, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलताई राठोड, उपाध्यक्ष भावनाताई नखाते, महापौर मीनाताई वरपूडकर, माजी महापौर प्रताप देशमुख, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा नंदाताई राठोड, मीनाताई राऊत आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चक्रधर उगले यांनी केले.
मनुस्मृतीचे केले दहनयावेळी छगन भूजबळ यांच्या हस्ते मनुस्मृतीच्या पुस्तिकेचे कार्यक्रमाच्या प्रारंभी दहन करण्यात आले. महिला, मुली, बहुजनांना शिक्षण घेऊ देत नाही ती मनुस्मृती काय कामाची म्हणूनच बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले होते आणि आजही मनुस्मृतीच्याच दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणूनच या मनुस्मृतीचे आम्ही दहन केले, असे यावेळी बोलताना छगन भूजबळ म्हणाले.