परभणी : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.
क्षयरोग नियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर टीबी फोरम समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुगळीकर म्हणाले, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुग्ण केंद्रीय सेवा व रोग नियंत्रणासाठी लोकसहभाग वाढवून त्वरित प्रतिसाद मिळविणे महत्त्वाचे आहे. तेव्हा उद्दिष्ट समोर ठेवून अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कालिदास निरस यांनी प्रास्ताविक केले. या बैठकीस मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस. पी. देशमुख, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सुरवसे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्पना सावंत, आयएमएचे अध्यक्ष डॉ. ए.के. कान्हे, जि. प. सदस्य राजेश फड, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी डॉ.पवन चांडक, एड एन. बी. कुकडे, रामेश्वर यादव, देवेंद्र लोळगे आदींची उपस्थिती होती.
मनुष्यबळ वाढविण्यास प्राधान्य देऊ : टाकसाळे
सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या कार्यक्रमांतर्गत आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध केले जाईल. त्यासाठी तत्काळ रिक्त पदे भरण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिली.