पाथरी ( परभणी ) : शहरातील शिवाजी नगर भागात आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी चक्क देवघरातील ७०० ग्राम वजनाच्या ५ चांदीच्या मूर्ती लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पाथरी शहरातील शिवाजी नगर भागातील देवनांदरा शाळेच्या समोर बाजार समितीचे संचालक तथा काँग्रेसचे पदाधिकारी प्रभाकर शिंदे यांचे घर आहे नेहमी प्रमाणे कुटुंबासोबत बेडरूममध्ये झोपले होते. सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्याने मागील भागातील खिडकीच्या जाळ्या तोडून घरात प्रवेश केला. चोरटे थेट देवघराकडे गेले त्याच वेळी प्रभाकर शिंदे यांच्या पत्नीला अचानक जाग आली. घरात कशाचा तरी आवाज येत असल्याचे लक्षात आल्याने दोघेही उठले. यामुळे चोरट्याने घरातून लागलीच पोबारा केला. मात्र, शिंदे यांनी नंतर पाहणी केली असता देवघरातील ७०० ग्राम वजनाच्या चांदीच्या ५ मूर्ती लंपास झाल्याचे आढळून आले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, चोरट्यांचा मागमूस लागला नाही. प्रभाकर शिंदे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पेट्रोलिंगची गाडी याच भागातस्थानिक पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करत असताना याच भागात होते. त्याच वेळी चोरट्यांनी या भागात चोरी केली आहे. त्यामुळे पेट्रोलिंगला येणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेऊन चोरटे हात साफ करत आहेत. वारंवार अशा घटना घडत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.