पाथरी (परभणी ) : गोदावरी नदीच्या पात्रातील ढालेगाव येथील बंधारा गुरुवारच्या पावसाने ७५ टक्के भरला गेला आहे. सध्या बंधाऱ्याची पाणी पातळी ३९३.५० मीटर अजून ११.३५ दलघमी पाणी साठा आहे. बंधाऱ्यात अजूनही पाण्याची अवाक सुरू आहे. या भागात एका दिवसात १०० मिमी पाऊस पडला. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे
तालुक्यात गुरुवारी (दि. १६ ) पहाटे ३ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली होती. यानंतर संपूर्ण तालुक्यात दिवसभर पाऊस पडला. तसेच पहाटेपर्यंत पाऊस सुरूच होता. काल एका दिवसात तालुक्यात १०० मीमी पाऊस झाला. पाथरी महसूल मंडळात १४२ मीमी पावसाची नोंद झाली. दिवसभर झालेल्या संततधार पावसाने नदी नाले तुडूंब भरून वाहत आहेत. यामुळे गोदावरी नदीवरील ढालेगाव येथील बंधारा सकाळपर्यंत ७५ टक्के भरला होता. या बंधाऱ्याची क्षमता १४.४८ दलघमी असून सध्या बंधाऱ्यात एकूण पाणी साठा ११.३५ एवढा झाला आहे. पाण्याची पातळी ३९३. ५० मीटर असून ९.९८ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. गतवर्षी १९ ऑगस्ट रोजी बंधारा भरल्याने गेट उघडून पाणी सोडण्यात आले होते. बंधाऱ्यात आणखी पाण्याची अवाक सुरू असून दिवसभर पाऊस राहिला तर बंधारा पूर्ण भरला जाईल.