गडचिरोली येथील गोकुळनगर भागातील बाबूराव काटवे यांच्या नातेवाईकांना निनावी नंबरवरून १५ दिवसांपूर्वी फोन आला होता. परभणीतून बोलत असल्याचे सांगून सहा-सात किलो सोन्याचा हंडा सापडला आहे. त्यापैकी एक किलो सोने जर तुम्ही विकून दिले तर तुम्हाला ५० ग्रॅम सोने दिले जाईल, असे या भामट्याने काटवे यांच्या नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी ही माहिती बाबुराव काटवे यांना सांगितली. काटवे यांनी या व्यक्तींशी संपर्क साधून सोन्याबाबत विचारणा केली. ३० हजार रुपये तोळा या दराने सोने असून, एक किलो सोने विकून दिल्यास ५० ग्रॅम सोने दिले जाईल, असे आरोपींनी काटवे यांना सांगितले. मागील पंधरा दिवसापासून बाबुराव काटवे यांना आरोपींनी वारंवार फोन केले.
या सर्व प्रकारानंतर बाबुराव काटवे हे १५ मार्च रोजी सकाळी ७ वाजता चारचाकी वाहन (क्र. एम.एच.३३/व्ही ४७३१) ने परभणीकडे निघाले, तेव्हा वाटेतच आरोपींनी फोन करून लोहा येथे येण्यास सांगितले. त्यामुळे काटवे व त्यांच्यासोबतचे इतर काही जण लोहा येथे जाण्यासाठी निघाले. लोहा येथे पोहोचल्यानंतर १६ मार्च रोजी पहाटे ३.४५ च्या सुमारास आरोपींनी त्यांना गंगाखेडच्या पुढे येण्यास सांगितले. त्यानुसार काटवे हे दत्तवाडी शिवारात पोहोचले. त्यावेळी दोन पुरुष व दोन महिला त्या ठिकाणी उभ्या होत्या. काटवे हे गाडीतून खाली उतरताच एका महिलेने त्यांना बनावट सोने दाखविले. हे सोने बनावट असल्याने काटवे यांनी घेण्यास नकार दिला व ते गाडीत बसण्यासाठी निघाले. त्याचवेळी इतर दोघांनी त्यांना पकडून मारहाण केली. गाडीची झडती घेऊन १ लाख ४० हजार रुपये आरोपींनी काढून घेतले. याप्रकरणी बाबुराव काटवे यांच्या फिर्यादीवरुन सोनपेठ पोलीस ठाण्यात १ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने तपास करीत आहेत.