शुभमुहूर्त
जुलै व ऑगस्ट महिन्यात लग्नाचे शुभमुहूर्त उपलब्ध आहेत. यामध्ये ३, ५, ६, ७, ८, १८, १९, २२, २५, २६, २८, २९ या जुलै महिन्यातील, तर ऑगस्ट महिन्यातील ४, ११, १४, १८, २०, २१, २५, २६ या तारखांनाही लग्न सोहळे करता येऊ शकतात.
या असतील अटी...
सध्या लग्न सोहळे मंगल कार्यालयात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रीतसर अर्ज सादर करीत परवानगी घ्यावी लागते. यामध्ये दोन्हीकडील ५० लोकांना लग्न सोहळ्यास उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. ही परवानगी केवळ एक दिवसाच्या लग्न सोहळ्यासाठी देण्यात येते.
परवानगीसाठी अग्निदिव्य
शहरातील कोणत्याही मंगल कार्यालयात लग्न सोहळा करण्यासाठी वधूपित्याला किंवा वरपित्याला मंगल कार्यालय उपलब्ध आहे का नाही, यानुसार पुढील प्रक्रिया पार पाडावी लागते. ज्या तारखेचे लग्न ठरले आहे, त्या दिवसाची परवानगी घेण्यासाठी वधू किंवा वरपित्यालाच जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज सादर करावा लागतो. यानंतर तेथून मिळालेल्या परवानगीच्या आधारे मंगल कार्यालयातील सर्व बाबींची पूर्तता करावी लागते. विशेष म्हणजे केवळ ५० जण आणि त्यातही कोरोनाचे सर्व नियम पाळून लग्न पार पाडणे गरजेचे आहे; अन्यथा नियम मोडल्यास स्थानिक प्रशासन कारवाई करते.
मंगल कार्यालय मालक अडचणीत
परभणी शहरात तीस मंगल कार्यालये आहेत. प्रशासनाने पहिल्या लाटेनंतर काही ठिकाणी दोनशे लोकांना परवानगी दिली होती. मात्र, येथील स्थानिक प्रशासन केवळ ५० लोकांनाच लग्नासाठी परवानगी देत आहे. याव्यतिरिक्त हॉल असो की हॉटेल व घरगुती होणारे समारंभ येथे मात्र बिनदिक्कतपणे कोणतीही परवानगी न घेता लग्न सोहळे पार पाडले जात आहेत. असे असताना केवळ मंगल कार्यालयांत होणाऱ्या लग्न सोहळ्यांनाच जाचक अटी लादल्या जात आहेत. या अटी बदलण्याची मागणी मंगल कार्यालय मालकांकडून प्रशासनाने केली जात आहे.