परभणी : मुंबईतील श्रीमंतांच्या पोरांची चिंता करून तुम्ही नाईट लाईफ सुरू केली; परंतु, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना वीज मिळत नाही़ म्हणून पिकांना पाणी देता येत नाही़ रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून हे शेतकरी पिके जगविण्यासाठी धडपड करतात़ त्यामुळे या सरकारने रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करावा व शेतकऱ्यांच्या नाईट लाईफची चिंता करावी, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले़
परभणी येथे संजिवनी एज्युकेशन सोसायटी, आनंद शिक्षण प्रसारक मंडळ व संजिवनी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते़ व्यासपीठावर माजी मंत्री आ़ बबनराव लोणीकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ अशोक ढवण, आ़ मेघना बोर्डीकर, माजी आ़ मोहन फड, विजय गव्हाणे, गजाननराव घुगे, भाऊसाहेब देशमुख, संयोजक तथा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे आदीची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील जनता होरपळून निघते़ त्यामुळे या जनतेला दिलासा देण्यासाठी इस्त्रायली तंत्रज्ञानाचा अभ्यास करून व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ६४ हजार किमीची धरणे जोडणारी मराठवाडा वॉटरग्रीड योजना कार्यान्वित करण्यात आली़ या योजनेंतर्गत ५ जिल्ह्यांच्या कामांची निविदा प्रक्रियाही झाली होती़ आता हे सरकार सर्वेक्षणाच्या नावाखाली मराठवाडा वॉटरग्रीडचे काम थांबवू पाहत आहे, असे झाले तर हा मराठवाड्यावर सर्वात मोठा अन्याय ठरेल़ सरकारला या योजनेमध्ये बदल करायचा असेल तर त्यांनी निश्चित बदल करावा; परंतु, तांत्रिक कारणे सांगून बहाणे करू नये़ जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग असतो आणि जिथे इच्छाशक्ती नसते तिथे सर्वेक्षण असते, असा टोला त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला़