लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सीसीआयने सुरु केलेली कापूस खरेदी दोन आठवड्यांपासून बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने कवडीमोल दराने खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत आहे.
बोरी येथे सीसीआयकडून कापूस खरेदी करण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत होती. यावर्षी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. काही दिवस कापूस खरेदी चालली. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हाताशी आलेला कापूस शेतकरी नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांना विकत आहेत. या संधीचा फायदा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे कापसाचे दर कोसळले आहेत. कवडीमोल दराने शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. ही व्यापाऱ्यांसाठी संधी असल्याने बोरी बाजार समिती अंतर्गत कौसडी, वस्सा, दूधगाव, आसेगाव, तांदुळवाडी, वर्णा, निवळी, वाघी बोबडे, पिंपरी आदी गावांमध्ये जावून व्यापारी शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी येथे तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी होत आहे.