औंढा नागनाथ: राज्यातील ओबीसी समाजाची सरकार फसवणूक करत असून सुप्रीम कोर्टात सादर केलेला अहवाल त्यांनी जनतेसमोर सादर करावा असे खुले आव्हान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी शासनाला केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या दोन दिवसीय ओबीसी प्रशिक्षण शिबिराचा समारोप करत असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.
राज्यामध्ये मंडल आयोगानंतर राजकीय, शैक्षणिक विविध क्षेत्रात 27 टक्के आरक्षण 1990 सालापासून लागू झाले आहे, ते आजपर्यंत टिकून राहिले होते. परंतु मधल्या काळात ओबीसी आरक्षण कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षण गेले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी राज् मागासवर्गीय आयोगाला अहवाल सादर करणार होते. त्यांनी तसे न करता राज्याच्या मुख्य सचिवाला आहवाल दिले असल्याचे सांगितले.
एवढेच नाही तर काल-परवा सुप्रीम कोर्टात देखील त्यांनी अहवाल सादर केला असल्याच्या बातम्या मी वर्तमानपत्रातून वाचल्या असून या अहवालात नेमके काय दिले याचा खुलासा अद्याप शासनाने जनतेसमोर केला नाही. हा खुलासा जनतेसमोर करण्याचे आव्हान आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. त्यांनी पुढे बोलताना म्हणाले की शासन चुकीच्या पद्धतीने चालत असून कायदेशीर बाबीचे कुठेही पालन केल्या जात नाही पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका इत्यादी ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत.
असंविधानिक काम शासन करीत असल्यामुळे शासनावर असलेला भरोसा उडाला आहे. राज्यात दोन दोन मंत्र्यांना कोर्टाने शिक्षा देऊनही ते मंत्री छातीठोकपणे मंत्रिमंडळात आहेत मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्यांना अगोदर मंत्री पदापासून दूर करावे अशी टीका त्यांनी यावेळी करून ३५६ कलमान्वये राज्यपालांनी हस्तक्षेप करून सरकार बरखास्त करण्याची मागणी आम्ही करणार असल्याचे सांगितले आहे.
आगामी निवडणुका भाजप मनसे वगळता इतर पक्षासोबत लढविणार
आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणूका काँग्रेस सोबत लढवण्याची आम्ही तयारी दाखवली असून यासाठी समझोता करण्यासाठी मागील पंधरा दिवसांपासून काँग्रेसला आमंत्रण देण्यात आले आहे. परंतु अद्याप एकाही नेत्याने याबाबत चर्चा केली नाही, असे असले तरीही येणाऱ्या निवडणुका भाजप व मनसे वगळता इतर पक्षांसोबत वंचित बहुजन आघाडी युतीकडून होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद दिली आहे .यावेळी राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक नागोराव पांचाळ,विभागीय प्रशिक्षक डॉ सुरेश शेळके,वाशिम देशमुख,जिल्हा अध्यक्ष सुरेश धोत्रे,डॉ चित्रा कुरे,तालुका अध्यक्ष गंगाधर देवकते,नगरसेवक गौस कुरेशी,शफिक नदाफ, बाळासाहेब साळवे,अरविंद मुळे, शेख रफीक, सुनील मोरे,प्रकाश गव्हाणे,चंद्रमणी मुळे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.