परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात यावे, यासाठी अनेक वर्षांपासून सर्वपक्षीय नेते मंडळींकडून आंदोलन करण्यात येत आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आदींची जिल्ह्यातील नेतेमंडळींनी भेट घेतली होती. यावेळी त्यांना परभणीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी सोमवारी विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा येथे शासकीय वैैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परभणी व अमरावती येथेही महाविद्यालय स्थापन करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कधी हे मात्र नमूद करण्यात आलेले नाही. शिवाय नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरिता जमीन, पायाभूत सुविधा, बांधकाम, वित्त पुरवठा, संचालन व देखभाल यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक- खासगी भागिदारीचे धोरण निश्चित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार असले तरी त्यासाठीच्या निधीची तरतूद, पदनिर्मितीस मंजुरी आदी बाबींसाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार नाही, हे निश्चित आहे.
सार्वजनिक- खासगी भागिदारीमुळे संभ्रम
अर्थसंकल्पात नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक- खासगी भागिदारीचे धोरण निश्चित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या धोरणाचा विचार केला असता, खासगी विकासक व शासन यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊ शकते. त्यामुळे पूर्णत: शासकीय महाविद्यालय राहील का, याविषयी संभ्रम आहे.
जालना- नांदेड जोडमार्गाचा लाभ
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम ४४ टक्के पूर्ण झाले असून, ७०१ कि.मी.पैकी ५०० कि.मी.चा नागपूर- शिर्डी हा महामार्ग महाराष्ट्रदिनी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्याच्या विकासासाठी लाभ व्हावा, या उद्देशाने नांदेड ते जालना या २०० कि.मी. लांबीचे ७ हजार कोटी रुपयांचे अंदाजित रकमेचे द्रुतगती जोडमार्गाचे काम हाती घेण्यात आले असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. त्यामुळे या समृद्धी महामार्गाचा परभणी जिल्ह्याला लाभ होणार आहे.