मानवत (परभणी) : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस, तूर पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दुंपारी तालुक्यातील कोल्हा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत मुंडे यांनी त्यांना धीर दिल. तसेच भरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे, सर्वांनी ऑनलाइन तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन नुकसानीचा आढावा घेताना मुंडे यांनी केले.
जिल्ह्यात एक आणि दोन सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. नदी नाल्यान्या पूर आल्यामुळे व सतत पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील कापूस सोयाबीन तूर पिकांचे मोठे नुकसान झाले. मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी कृषिमंत्री मुंडे यांनी मानवत ते परभणी रस्त्यावर कोल्हा शिवारातील नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी सवांद साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी कराव्यात, सरकार भरपाई देण्याबाबत सकारात्मक आहे, असा धीर मुंडे यांनी दिल.
दरम्यान, यावेळी कृषी विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुंडे यांनी दिले. यावेळी आ. राजेश विटेकर, आ. सुरेश वरपुडकर, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, उपसभापती नारायणराव भिसे, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी,तहसीलदार पांडुरंग माचेवाड, विभागी कृषी सह संचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलतराव चव्हाण, रवी हरणे, आदी उपस्थित होते.