पूर्णा ( परभणी ) : मागील दोन दिवसात मराठवाड्यासह विदर्भात गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे त्वरित पंचनामे करावीत, यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी केली. आज दुपारी त्यांनी गारपीट ग्रस्त चुडावा या गावाला भेट दिली.
गारपिटीत सोमवारी मृत्युमुखी पडलेल्या भागिरथीबाई कांबळे यांच्या कुटुंबियांना खासदार चव्हाण यांनी आज दुपारी भेट दिली. तसेच या भागातील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली व महसूल प्रशासनाने याचे त्वरित पंचनामे करावेत अशा सूचना केल्या. यासोबतच शासनाने गारपीटग्रस्तांना तातडीची मदत जाहीर करावी, यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली. यावेळी आमदार मधुसूदन केंद्रे, डी. बी. सावंत, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, माजी खा. तुकाराम रेंगे, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, रविराज देशमुख, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शहाजी देसाई, व्यंकट राव देसाई आदींची उपस्थिती होती.