परभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जे वक्तव्य केलं आहे, असं वक्तव्य कोणीही करू शकत नाही. प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल देवाच्या पलीकडील प्रेम आहे. त्यामुळे राज्यपालांचे वक्तव्य सहनशक्तीच्या पलीकडचे आहे. याचे परिणाम होणार, असा इशारा राज्याचे समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे यांनी येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिला.
परभणी येथील राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सोमवारी रात्री शहरातील बी. रघुनाथ सभागृहात खान यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, कोणीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असं वक्तव्य करू शकत नाही. प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल देवाच्या पलीकडे प्रेम आहे. इथे मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अभद्र बोलतात. हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील, जगातील कोणीही सहन करू शकणार नाही. हे सहनशक्तीच्या पलीकडचे आहे. राज्यपालांनी जी हिंमत केली आहे. याचे परिणाम होणार, असा इशारा मुंडे यांनी यावेळी दिला.
तत्पूर्वी झालेल्या सत्कार समारंभास आमदार सुरेश वरपुडकर, आ. डॉ. राहुल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला विटेकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, नगरसेवक माजूलाला, रविराज देशमुख, तहसीन अहेमद खान, कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार ॲड. विजय गव्हाणे आदींची उपस्थिती होती. यावेळी खासदार खान यांचा समाजकल्याणमंत्री मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.