परभणी : राज्यातील शेतकरी अस्मानीसह सुलतानी संकटात सापडले आहे. पीक नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून सुद्धा हे सरकार सण, उत्सव आणि हारतुऱ्यातच अधिक गुंतले असल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांकडे पाहण्यासाठी सरकारला वेळ कुठे आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी परभणीत केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंगळवारी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता, तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
परभणी जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीत परभणी जिल्ह्यातील केवळ आठ महसूल मंडळांचा समावेश करण्यात आल्याची स्थिती आहे. उर्वरित मंडळात नुकसान होऊनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी नुकसानभ रपाईपासून वंचित असल्याची जिल्ह्यात स्थिती आहेत. राज्यातील बहुतांश भागातही अशीच स्थिती आहे. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारला याबाबत काही देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला आजही गांभीर्य नसल्याची स्थिती आहे. हे सरकार स्थापनेपासून फक्त सण, उत्सव आणि हारतुऱ्यातच मग आहे. यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळच कुठे आहे, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री स्वागत, सत्कारात मग्न शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासून केवळ सत्कार समारंभात मग्न असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात ठिकठिकाणी त्यांच्या आमदारांकडे सत्कार, स्वागताच्या कार्यक्रमास अधिक हजेरी लागत असल्याची स्थिती आहे. राज्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुद्धा त्याबाबत शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाच सकारात्मक निर्णय होत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली.