गंगाखेड : तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असताना गावागावांत होत असलेल्या दुरंगी-तिरंगी व चौरंगी लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. ग्रामीण भागात उमेदवारांनी अटीतटीच्या लढतीत पारंपरिक प्रचार साधनांना फाटा देत सोशल मीडियावर प्रचाराचा धुराळा उडविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
गंगाखेड तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींपैकी ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. ७० पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या आहेत तर बनपिंपळा ग्रामपंचायतीमधील सातपैकी सहा सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. या ठिकाणी केवळ एका जागेसाठी दोन उमेदवारांमध्ये लढत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाऊबंदकीबरोबरच इसाद येथे दोन सख्खे भाऊ, पुतणी-नणंद-भावजय, भेंडेवाडी येथे पुतण्या समाेरासमोर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. यापूर्वी निवडणुकीदरम्यान, प्रचारासाठी गावातील-चौकाचौकांत असलेल्या भिंती रंगविणे, डिजिटल बोर्ड लावणे, स्पीकर लावलेल्या वाहनांतून गावात प्रचार करणे, सायंकाळी प्रचारफेरी काढून रात्री जेवणावळी देणे असे चित्र पारंपरिक प्रचारात पाहावयास मिळत होते. सद्य:स्थितीत मात्र पारंपरिक प्रचारयंत्रणेला फाटा देत आपल्या पॅनेलचे ध्येय-धोरण, निवडणूक चिन्हाच्या प्रचारासाठी प्रभागातील प्रश्न, केलेली कामे, विरोधकांच्या कामांचा पंचनामा करणारे चलचित्र (व्हिडिओ), फाेटो तयार करून सोशल मीडियावर अपलोड करण्यात येत आहेत. सोशल मीडियाचा माध्यमातून प्रचाराचा भडिमार मतदारांवर केला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.
या गावांत होणार रंगतदार लढती
गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव, ईसाद, धारासुर, मरडसगाव, पिंपळदरी, सुप्पा, कोद्री, खळी, आरबुजवाडी, अंतरवेली, अकोली, आनंदवाडी, बडवणी, बोथी, बनपिंपळा, भेंडेवाडी, बोर्डा, चिंचटाकळी, डोंगरपिंपळा, डोंगरगाव, ढवळकेवाडी, ढेबेवाडी, दामपुरी, दगडवाडी, दुस्सलगाव, धारखेड, धनगरमोहा, इरळद, गोपा, गौडवाडी, गौंडगाव, गुंजेगाव, जवळा (रूमणा), हरंगुळ, देवकतवाडी, गोदावरी तांडा, कातकरवाडी, कौडगाव, कासारवाडी, खंडाळी, खोकलेवाडी, खादगाव, लिंबेवाडी, मरगळवाडी, मालेवाडी, मैराळसावंगी, माखणी, मानकादेवी, मुळी, मसला, नरळद, पडेगाव, पांढरगाव, पांगरी, पोखर्णी वाळके,, सेलमोहा, शेंडगा, सायळा (सुनेगाव), सांगळेवाडी, सुरळवाडी, टोकवाडी, तांदुळवाडी, उंबरवाडी, उंडेगाव, उखळी खु., वरवंटी, वागदरा तांडा, वागदरी, वाघलगाव, झोला या गावांचा समावेश आहे.