बोरी (जि. परभणी) : जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे येथे सरपंच निवडीच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता घडली.
वाघी बोबडे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र, सरपंच निवडीच्या कारणावरून २५ जानेवारी रोजी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटातील ६ जण गंभीर जखमी झाले असून, या जखमींना बोरी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
याप्रकरणी २६ जानेवारी रोजी प्रदीप प्रभाकर रोहीणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन प्रतापराव बोबडे, माऊली भास्कर बोबडे, शिवाजी माणिक बोबडे यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे. दुसऱ्या बाजूने नितीन प्रतापराव बोबडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रदीप प्रभाकर रोहीणकर, प्रशांत प्रभाकर रोहीणकर, प्रभाकर बालासाहेब रोहीणकर, भास्कर हरिभाऊ रोहीणकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मार्कड तपास करीत आहेत.