परभणी- वेतनश्रेणी, निवृत्ती वेतन आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी २० जानेवारी रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आपल्या मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत़ या आंदोलनात जिल्ह्यातील ५०० हून अधिक ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले आहेत़
परभणी जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत़ शासनाकडे पाठपुरावा करूनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने आक्रमक झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या माध्यमातून सोमवारी धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता़ त्या अनुषंगाने सोमवारी सकाळपासूनच जिल्हाभरातून ग्रामपंचायत कर्मचारी परभणीत दाखल झाले आहेत़ जिल्ह्यात ७५० ग्रामपंचायती असून, त्यात सुमारे १८०० कर्मचारी काम करतात़ त्यापैकी ५०० कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला आहे़
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करावी, निवृत्ती वेतन लागू करावे, उपदान लागू करावे, भविष्य निर्वाह निधी जमा करावा, सुधारित किमान वतेन लागू करावे, वसुलीची अट रद्द करावी, कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले़ संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण होंडे, उपाध्यक्ष प्रभाकर सज्जन, सचिव दत्ता चौधरी, परमेश्वर कटारे, महादेव गायकवाड यांच्यासह बहुसंख्य कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत़