परभणी : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेतेमंडळींना धक्के देणारे निकाल लागले आहेत. काही दिग्गज नेत्यांनी मात्र आपले गड राखण्यात यश मिळवले असल्याचे दिसून येत आहे.
परभणी जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी ६८ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. १५ जानेवारी रोजी ४९८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्यानंतर सोमवारी सकाळी ८ वाजेपासूनच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अनेक ग्रामपंचायतींचे निकाल लागले असून प्रस्थापितांना धक्का बसल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिंतूर तालुक्यातील बलसा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पंचायत समितीच्या सभापती वंदना गणेश इलग यांच्या पॅनलचा पराभव झाला असून उपसभापती शरद मस्के यांच्या पॅनलचाही जोगवाडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. पांगरी ग्रापंचायतीच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई बुधवंत यांना काठावर बहुमत मिळाले आहे. करंजी व धमधम ग्रापंचायतीत शिवसेना-भाजप पॅनलविजयी झाले आहे. रेपा ग्रामपंचायतींच्या सात जागा जिंकून राष्ट्रवादीने एक हाती वर्चस्व मिळविले आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्वला राठोड यांना पिंपळगाव काजळे तांडा ग्रा.प.त काठावरचे बहुमत मिळाले.
सेलू तालुक्यातील तांदळवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलने ७ पैकी ४ जागा जिंकून ग्रामपंचायतवर वर्चस्व मिळवले आहे. यापुर्वी ही ग्रा.प. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. आहेर बोरगाव ग्रा.प. मध्ये माजी आ. हरिभाऊ लहाने यांच्या पॅनलला बहुत मियाले असून वालूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संजय साडेगावकर यांच्या पॅनलला यश मिळाले आहे.
पाथरी तालुक्यातील उमरा ग्राप निवडणूकीमध्ये काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस - आणि शिवसेना अशी तिरंगी लढत झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेस ४, शिवसेना ३, काँग्रेस २ जागा मिळाल्या. कोणत्याही गटाला बहुमत मिळाले नाही. हदगाव बु ग्रा प निवडणूकीत राष्ट्रवादीचे बाजार समिती सभापती अनिल नखाते यांच्या पॅनलला ११ पैकी ८ जागांवर विजय मिळाला. पाथरी शहरालगतच्या देवनांदरात १३ पैकी ११ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणी यांनी स्वतः लक्ष घातले होते. बाजार समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माधवराव जोगदंड यांच्या गटाला बाबूलतार ग्राप मध्ये ९ पैकी ७ जागा मिळाल्या.
सोनपेठ तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत शेळगावमध्ये १५ पैकी १५ जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. विटा खु ग्रामपंचायत निवडणूकीत माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर गटाने ६ तर विरोधी गटाने ३ जागांवर विजय मिळविला. पालम तालुक्यातील आऱखेड ग्रा.प.त ९ पैकी ९ जागा शेकाप-राष्ट्रवादीने मिळविल्या.