जिंतूर (परभणी ) : जिंतूरहून पाचलगाव-निवळी मार्गे सेलू या नवीन रस्त्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार असून, ९० कोटी रुपयांचा हा रस्ता बाजारपेठ व दळणवळणाच्या दृष्टीने नागरिकांसाठी सोयीचा बनणार आहे़ पाचलेगाव तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या या रस्त्यामुळे जिंतूर-सेलू हे अंतर ६ किमीने कमी होणार आहे़
जिंतूर, सेलू हे दोन तालुके आहेत़ जिंतूरहून सेलूकडे जाण्यासाठी देवगावफाटा मार्गे जावे लागते़ हे अंतरर ४१ किमीचे आहे़ त्यामुळे जिंतूर-सेलूचे अंतर कमी करण्यासाठी पाचलेगाव-निवळी या मार्गे रस्त्याचे काम व्हावे, यासाठी या भागातील नागरिक अनेक दिवसांपासून मागणी करीत होते़ पाचलेगाव हे संत पाचलेगावकर यांचे जन्मस्थान आहे़ या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे़ परंतु, मागील चार ते पाच वर्षांपासून पाचलेगावला जाण्यासाठी रस्त्याची व नदीवरील पुलांची मोठी अडचण होती़
जिंतूर-पाचलेगाव-निवळी-आडगाव-राजवाडी मार्गे सेलू मार्गाने जिंतूर-सेलू हे ४१ किमीचे अंतर ३५ किमीच्या जवळपास होणार आहे़ संबंधित कामाच्या निविदा कल्याण टोल इन्फोटेक्चर यांनी घेतले असून, साधारणत: दोन वर्षांत रस्ता व पुलांची कामे करण्यात येणार आहे़ सर्वसाधारणपणे साडेपाच किमीचा हा रस्ता असून, त्यामुळे नागरिकांना सेलू, जिंतूर बाजारपेठेसाठी व दररोजच्या दळणवळणासाठी सोयीचा मार्ग उपलब्ध होणार आहे़
सातत्याने पाठपुरावा
जिंतूर-पाचलेगागाव-निवळी-राजवाडीमार्गे सेलू या मार्गासाठी सातत्याने विधानसभेत पाठपुरावा केला़ गेल्यावर्षी या कामासाठी ९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली़ दोन निविदा निघाल्या़ मात्र कोणीही पुढे आले नाही़ यावर्षी कल्याण टोल इन्फोटेक्चर यांनी हे काम घेतले असून, वर्षभरात हा मार्ग पूर्ण होणार आहे़- विजय भांबळे, आमदार