परभणी : जिल्ह्यातील ४ हजार ६७७ शेतकरी प्राप्ती कर भरत असतानाही केंद्राच्या पीएम किसान योजनेचा लाभ घेत असल्याची बाब उघड झाली असून, या धनिक शेतकऱ्यांना वितरित झालेले ४ कोटी २४ लाख १६ हजार रुपयांचे अनुदान शासनाला परत करावे लागणार आहे.
गरीब व गरजू शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेत धनिकांचा समावेश झाल्याची बाब समोर आल्यानंतर शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने पीएम किसान योजनेतील ४ हजार ६७७ शेतकऱ्यांना नोटीस पाठवून अनुदान परत करण्याचे सूचित केले आहे.
साडेचार हजार शेतकरी करदातेजिल्ह्यात ४ हजार ६७७ शेतकरी करदाते असून, त्यात जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ८२८, परभणी तालुक्यात ७००, सेलू ६५१, गंगाखेड ४५३, पाथरी ४४९, पूर्णा ३९२, मानवत ४०६, मानवत तालुक्यात ४३० करदाते शेतकरी आहेत.
एकानेही परत केली नाही रक्कमकरदाते असताना लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत एकाही शेतकऱ्याने उचलले अनुदान परत केले नाही. सध्या ही प्रक्रिया नोटीस स्तरापर्यंत आहे.
आधार प्रमाणिकरणाचे अपात्रतेसाठी कारण पीएम किसान योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण न झाल्याने काही नावे वगळली आहेत. तसेच काही शेतकऱ्यांनी पती-पत्नी असे दोघांचेही नावे समाविष्ट केली. या शिवाय कर भरत असतानाही योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची नावे वगळली आहेत.
इनकम टॅक्स भरत असतानाही अनुदानाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तहसीलस्तरावरून नोटीस दिल्या जात असून, या शेतकऱ्यांकडून वसुली केली जाणार आहे. - महेश वडदकर, निवासी उपजिल्हाधिकारी
तहसीलकडून वसुलीची प्रक्रिया सुरूकर भरत असतानाही अनुदानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना तहसील प्रशासनाने नोटीस पाठविल्या असून, प्रक्रिया सुरू आहे.