बसच्या दुरुस्तीकडे सर्रास दुर्लक्ष
परभणी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी आगारातील निम्म्यापेक्षा अधिक बसेसची बिकट अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे रस्त्यावरून धावणाऱ्या बसमध्ये वारंवार बिघाड होत असून, प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
सोनपेठ येथे गुटख्याची खुलेआम विक्री
सोनपेठ : शासनाने गुटख्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे, परंतु तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गुटखा बंदी केवळ नावालाच आहे की काय? असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
स्टेडियम परिसरात स्वच्छतागृहाचा अभाव
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरात स्वच्छतागृह नसल्याने व्यापारी व नागरिकांची कुचंबणा होत आहे. शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मनपाने या भागासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी केल्यास नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. तेव्हा जिल्हा स्टेडियम परिसरात स्वच्छतागृहे उभारण्याची मागणी होत आहे.
मशागतीचे दर वाढले
परभणी : दिवसेंदिवस डिझेलचे दर वाढत असल्याने मशागतीची कामे करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रतिलिटर डिझेलचे दर ८५ रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे मशागतीचे दरही पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढले आहेत. पारंपरिक शेतीबरोबरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे.