- प्रसाद आर्वीकर, (परभणी)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गृहविज्ञान महाविद्यालयातील संशोधकांनी खुरपणी, निंदणीसाठी लांब दांड्याचा विळा आणि गोपाळ खोऱ्याचे संशोधन केले आहे. ही दोन्ही यंत्रे शेतीकामासाठी उपयोगी ठरत आहेत.
शेतीत गवत काढण्यासाठी पूर्वीपासून विळ्याचा वापर केला जातो. दिवसभर महिला खुरपणी करून गवत काढण्याचे काम करतात. हे काम अत्यंत कष्टदायक आहे. शेतकरी महिलांचा हा त्रास कमी करण्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गृहविज्ञान महाविद्यालयाने यावर तोडगा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याबाबत बोलताना महाविद्यालयाच्या वरिष्ठ संशोधक डॉ. जयश्री झेंड म्हणाल्या की, शेतीमध्ये खुरपणी, निंदणी यासारखी कामे मुख्यत्वे महिलाच करतात. ही कामे करताना ग्रामीण भागातील महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या महिलांना यामुळे पाठदुखी तसेच कंबरदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागते.
गृहविज्ञान महाविद्यालयातील संशोधकांनी महिलांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यांना सोयीचे होईल, अशा पद्धतीचे साहित्य तयार करण्याचे काम हाती घेतले. खुरपणी आणि निंदणी करताना सर्वसाधारपणे वापरला जाणारा विळा हा लहान आकाराचा असतो. गवत काढताना विंचू, काट्यापासून धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लांब दांड्याच्या विळ्याचे संशोधन करण्यात आले आहे. तसेच गोपाळ खोरेही या संशोधकांनी विकसित केले आहे. लांब दांड्याच्या विळ्यामुळे उभे राहून गवत काढता येते तसेच उभे राहून निंदणी करता येते, असे डॉ. जयश्री झेंड यांनी सांगितले. ही दोन्ही यंत्रे महिला शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असून, या यंत्रांमुळे कामाला गती मिळत असल्याचेही डॉ. झेंड यांनी सांगितले.